विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीचा स्कूल सेफ्टी प्रोजेक्ट फायलीमध्येच!

0

राज्य सरकारचा पहिलाच प्रोजेक्ट बारगळला

मुंबई । शालेय विद्यार्थ्यांसाठी आपत्तीच्या सुरक्षेसाठी विदयार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्कुल सेफ्टी प्रोजेक्ट राज्य सरकारकडून घोषित करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांच्या सह्या होऊनही अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्यात या प्रकल्पाचा श्रीगणेशा करतानाच अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. हा प्रोजेक्ट २०१६ पासून लालफितीत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या सुमारे ७ कोटींची तरतूद असलेल्या या प्रकल्पाच्या टेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झाली आहे. मात्र तरीही यावर कार्यवाही जलदगतीने झाली नाही. यावरून सरकार विदयार्थ्यांच्या सुरक्षेसाठी किती तत्पर आहे हेच दिसून येत आहे. दरम्यान याबाबत आम्ही संबंधीत अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल असे सांगितले.

काय आहे स्कुल सेफ्टी प्रकल्प
या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित मास्टर ट्रेनर शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत. शाळेतील शिक्षकांच्या मदतीने आराखडे तयार करून विद्यार्थ्यांना मॉकड्रिल द्वारे आपत्तीबाबत माहिती दिली जाणार आहे. यामध्ये पूरपरिस्थिती, भूकंप, अग्निशमन याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. ही ऍक्टिव्हिटी २ वर्ष चालवायची असते. मात्र सरकार मात्र याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. आपत्ती काळात कसा सामना करावा यासाठी ११०० शाळेतील मुलांना सुरूवातीला प्रशिक्षण दिले जाणार आहे.