पुणे । भारतातील विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. ही मुले जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांच्या गुणांना वाव मिळतो. परंतु ही संधी त्यांना भारतात मिळत नाही. भारतातील बुध्दीमत्ता परदेशात जाते तेव्हा ती फुलते आणि भारतात राहते तेव्हा ती कुजते. परदेशात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा असते. भारतातील विद्यापीठांनीदेखील अशी संधी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
प्रभु ज्ञानमंदिरतर्फे निवारा वृद्धाश्रमासमोरील संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्तिक प्रभू आंतरशालेय वक्तृत्व व आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर, प्रभू ज्ञानमंदिरच्या संस्थापिका आणि लेखिका मीना प्रभू, निलिमा रेड्डा, डॉ. शेखर कुलकर्णी आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण कल्याणी गोखले, शैलजा सांगळे, मानसी मागीकर यांनी व वादविवाद स्पर्धेचे परिक्षण डॉ. रविबाला काकतकर, मधुरा कोरान्ने यांनी केले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेसाठी पुण्याची रहदारी समस्या व उपाय हा विषय तर वादविवाद स्पर्धेसाठी वैद्यकीय व्यवसाय अद्यापही उदात्य आहे की नाही हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला.
व्यापारीकरणामुळे वैद्यकीय व्यवसायाला गालबोट
दुसर्याचे दु:ख दूर करणारा वैद्यकीय पेशा आहे. परंतु या व्यवसायात व्यापारीकरण आल्यामुळे या पेशाला गालबोट लागले आहे. या परिस्थितीला अनेक कारणे कारणीभूत आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च केले तर जास्त पैसे मिळाले पाहिजे ही विचारसरणी लोकांची आहे, असे डॉ. के. एच. संचेती यांनी सांगितले. भारतातील डॉक्टर व रुग्णांचे गुणोत्तर काढले असता डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्यामुळे रुग्णांचा ताण त्यांच्यावर जास्त येतो. तसेच शहरातच सराव करणारे डॉक्टर ग्रामीण भागात जात नाहीत त्यामुळे स्पर्धा वाढते आणि या व्यवसायाला व्यवहाराचे स्वरूप येत आहे. परंतु सध्या वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी या गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे त्यांनी पुढे सांगितले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन, मीना प्रभू यांनी प्रास्ताविक व किरण ठाकूर यांनी आभार मानले.
पुणे बेशिस्त वाहतुकीचे शहर
भारतात कोणत्या शहरात अत्यंत चांगली वाहतूक आहे, असे विषय विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी दिले जात होते. परंतु आजमितीस कोणत्या शहरात अत्यंत बेशिस्त वाहतूक आहे यावर चर्चा केली जाते. सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर हे अत्यंत बेशिस्त वाहतूक असणारे शहर म्हणून सध्या ओळखले जात आहे. याला अनेक जण जबाबदार आहेतच परंतु त्याआधी आपण स्वत: जबाबदार आहोत. सतत शासनाला दोष देण्याआधी आपणही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले.