जळगाव । जिल्ह्यातील महाविद्यालयीन जीवनात स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अमुल्य ठेवा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ मिळते. शिक्षण हा जगातील सर्वात मोठा संस्कार आहे आणि तो देणार्या महाविद्यालयात आपण शिक्षण घेत आहात. आपल्यातील कलागुण जोपासून जीवनाला सुंदर करा तेच तुम्हाला आयुष्यभर आनंद देते असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि केसीई सोसायटीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विद्याधर पानट यांनी व्यक्त केले.
मूळजी जेठा महाविद्यालयात ‘चैतन्य 2017’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे, उपप्राचार्य प्रा.एन.व्ही.भारंबे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. जगदीप बोरसे आदी उपस्थित होते.
अपयशाने खचून जाऊ नका
50 वर्षार्पूर्वीच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना पानट सरांनी यावेळी उजाळा दिला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डॉ.उदय कुलकर्णी होते. यावेळी प्राचार्य म्हणाले की, आपल्यातून चांगले कलावंत,खेळाडू, संशोधक घडले पाहिजेत. आपण सर्व एकत्र येऊन संस्थेला आणि महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देऊ शकतो. अपयशाने खचून जाऊ नका असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर
महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून शुभम भोंगळे (टी.वाय.बी.ए.) याची निवड करण्यात आली. तसेच वर्षा रविंद्र उपाध्ये((टी.वाय.बी.ए.), श्रद्धा आनंद व्यास (टी.वाय.बी.एस्सी.), तेजस्विनी नाना बारी (टी.वाय.बी.काम.), सुमित किरण राठोड आणि प्रियंका सुनील पाटील (बी.एफ.ए.) या विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी पीएच.डी.पदवी प्राप्त व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालेल्या व पुरस्कार मिळविलेल्या प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
देशभक्तीपर गीतांने सजले स्नेहसंमेलन
महाविद्यालयातील कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक स्तरावर विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. महाविद्यालाच्या वतीने देण्यात येणारी गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठीची पारितोषिके यावेळी देण्यात आली. सूत्रसंचालन व आभार डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी केले. समारोप सोहळ्यापूर्वी ’मुल्जियन गायक स्पर्धा भाग 2’ घेण्यात आली. यात 5 स्पर्धकांनी संदेशे आते है, ये देश है वीर जवानो का, देश रंगीला रंगीला, हे प्रित जहा की रित सदा ही देशभक्तीपर गीते तसेच इतर गाणी सादर केली.