पुणे । रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, जाणीव युवा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने वॉटर आलिंपियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलिंपियाड प्रकल्पाचे उद्घाटन प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते नुकतेच झाले. ही स्पर्धा 20 मार्चला होणार असून, दिनांक 31 जानेवारी 2018 पर्यंत नावनोंदणी करायचे आवाहन करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर होते. यावेळी अशोक भंडारी, सतीश खाडे उपस्थित होते. पुणे विद्यापीठ कॅम्पसमधील पर्यावरण शास्त्र विभाग येथे हा कार्यक्रम झाला. रोटरीच्या या उपक्रमाचे प्रोटॉन जल हे मुख्य प्रायोजक आहेत. विद्यार्थ्यांना जलसंवर्धन क्षेत्रातील करीयर संधीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे उद्गार चौधरी यांनी काढले.
पाणी संकट संबंधित मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि येत्या दशकामध्ये या मुद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पाणी संकट आणि पाणीटंचाई विषयी तंत्रज्ञान आणि जनजागृती दिलासा देऊ शकतात. म्हणूनच नाविन्यपूर्ण आणि कृती करण्यासाठी युवकांना संधी देणे आवश्यक आहे, त्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, संकल्पना सूचना, पोस्टर स्पर्धा आणि लघुपट स्पर्धा यांचा समावेश आहे.