भुसावळ । शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने त्यांचे पालक होवून त्यांना ज्ञान आणि संस्काराचे धडे द्यावे. जीवनात संकटांशी लढण्याचे बळ त्यांच्यात निर्माण करावे. उद्याचा प्रगत व सामर्थ्यवान भारत ते निर्माण करतील, असे प्रतिपादन निवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप सुर्यवंशी यांनी केले. यावल तालुक्यातील दुसखेडा येथील स्व. अंजली सुर्यवंशी प्रतिष्ठानतर्फे अकलूद येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जतिन मेढे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आर्थिक विषमतेमुळे गरीब विद्यार्थ्यांना अडचणी
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सुर्यवंशी म्हणाले की, कष्टकरी, उपेक्षित वर्गात अजूनही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आर्थिक विषमता आहे. त्यामुळे मुलांचा शैक्षणिक खर्च करतांना अनेकांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची आवश्यकता असल्याचेही आवाहन त्यांनी केले. प्रा. जतिन मेढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकांची काळजी घेतल्यास ते जीवनभर आपली काळजी घेतात. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा ज्ञानाची श्रीमंती मोठी असते. त्यामुळे ग्रंथालय व संगणक विद्यार्थ्यांचे मित्र झाल्यास मन, मनगट आणि मेंदू ताकदवान होतील, असे सांगितले. प्रसंगी उपसरपंच जे.डी.पाटील, माजी सरपंच दशरथ कोळी, भुपेंद्र सुर्यवंशी, सुर्यकांत सुर्यवंशी, राजू कोळी, सुधाकर कोळी, कैलास राजपूत, भरत महाजन, नरेंद्र मेहेरे, मदन सपकाळे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. धनराज सोनवणे यांनी तर आभार मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी मानले.