पुणे । शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके मिळालेली नाहीत. अनेक शाळांत पुस्तकांचे अपूर्ण संच मिळाले आहेत. शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असून अनेक विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके वापरावी लागत आहेत.
विद्यार्थ्यांची गैरसोय
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शिक्षण विभागाकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. साधारणत: शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात ही पुस्तके मिळणे अपेक्षित असते. मात्र, सध्या शाळा होऊन दीड महिना उलटला आहे, तरीही अद्याप विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके मिळालेली नाहीत. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तकांचे संच मिळाले नाहीत. प्रत्येक इयत्तेची पुस्तकसंच अपूर्ण आहेत. शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना अपुरी पुस्तके मिळाली आहेत. अनेक विषयांची पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
पुस्तकांची कमतरता
सध्या इयत्ता पहिलीला गणित आणि इंग्रजी, दुसरीला गणित, तिसरीला मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर, पाचवीला गणित, सहावीला गणित आणि विज्ञान आणि सातवीला गणित, इंग्रजी आणि विज्ञान या पुस्तकांची कमतरता आहे. अनेक शाळांमध्ये या विषयांची पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत.