माळशिरस । मॅजीक बस व वोडाफोन यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचालित न्यू इंग्लिश स्कूल गुरोळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरोळी येथील 3 री ते 9 वीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत बूट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच रामचंद्र खेडेकर होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. मॅजीक बस राबवत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. मॅजीक बस ग्रामीण भागातील मुलांमध्ये आरोग्य, खेळ, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक बांधिलकी या गुणांची जोपासना करते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन फाउंडेशनकार्य करत आहे. हा उपक्रम गेल्या 7 वर्षांपासून राबवला जात आहे. सुमारे 9 हजार 500 विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत असल्याची माहिती फाउंडेशनचे समन्वयक संचालक संदीप जगताप यांनी दिली. यावेळी फाउंडेशनचे कोलते, आकाश शिळीमकर यांनी मनोगत व्यक्त केले.