जैन विद्यालयात विस्तारीत समाधान योजना शिबिर उत्साहात
रावेत : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने चिंचवड येथील जैन विद्या प्रसारक मंडळच्या फत्तेचंद जैन विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणार्या विविध दाखल्यांकरिता विस्तारीत समाधान योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्या कागदपत्रांबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेले अर्ज स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य चंदूराव कलंत्रे, उपप्राचार्य हनुमंत मारकड, नायब तहसीलदार संजय भोसले, मंडळाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी अश्विनी होडगे, महा ई सेवा केंद्राचे सचिन पवळे आणि विद्यालयातील कर्मचार्यांनी कामकाज पाहिले.
नागरिकांचा त्रास वाचणार
शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला, विविध जातींचे दाखले यांचा प्रामुख्याने समावेश होतो. इयत्ता 10, 12 वीचे निकाल लागल्यानंतर पालकांची अचानक या दाखल्यांसाठी पळापळ सुरू होते. अचानक दाखल्यांची मागणी वाढल्याने तहसील कार्यालयातील यंत्रणाही कोलमडून पडते. त्यातच आता हे दाखले ऑनलाईन झाल्याने बर्याच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. नागरिकांचा हा त्रास वाचावा, म्हणून तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी शाळांमधूनच दाखले देण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्या अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.