विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे – धर्माधिकारी

0
पतसंस्थेच्या स्नेहमेळाव्यात केले मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे : विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःला ओळखून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडल्यास यश निश्‍चीत मिळेल, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय भेगडे होते. तर मेळाव्यास जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, मावळ पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम, संस्थेचे प्रवर्तक इंदरमल ओसवाल, अध्यक्ष प्रकाश ओसवाल आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी मार्गदर्शन करावे
धर्माधिकारी पुढे म्हणाले की, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखुन त्याला मार्गदर्शन केले पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुणवत्ता ओळखून उत्तम प्रतिभावंत होण्याचा प्रयत्न करावा. तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, सहकार भारती मावळ तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, नगरसेवक अ‍ॅड.श्रीराम कुबेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्था अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांनी प्रस्ताविक केले. तर अनिल धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास जेष्ठ नेते केशवराव वाडेकर, मावळ तालुका भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, संदीप काकडे, किरण परळीकर, नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.