विद्यार्थ्यांनी उंच ध्येय ठेऊन सतत प्रयत्नशील राहावे : खा. सुप्रिया सुळे

0

कस्तुराबाई श्रीपती कदम माध्यमिक विद्यालयाच्या पाच वर्गखोल्यांचे भूमिपूजन

इंदापूर । विद्यार्थ्यांनी उंच ध्येय ठेऊन प्रयत्नशील रहावे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवीन पाच वर्गखोल्यांचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, महरुद्र पाटील, अमोल भिसे, यशवंत माने, रेहना मुलानी, डॉ. श्रेणीक शहा, धनंजय बाब्रस, विठ्ठल ननवरे, वसंतराव माळूजकर, श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

30 लाखांचा निधी
खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार फंडातून या शाळेसाठी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून बांधण्यात येणार्‍या पाच वर्गखोल्यांचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व विद्यालय शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या भौतिक सुविधांच्या पुर्ततेकरीता केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

विविध मागण्यांसाठी सुळे यांना साकडे
पालखी रिंगण सोहळा या विद्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी होतो. त्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, विद्यालयाला एक बहुउदेशीय सभागृह, 400 मीटरचा धावमार्ग, पहिलीपासून इंग्रजी माध्यमाची शाळा, व्यायाम शाळा व आणखी पाच वर्गखोल्यांच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांना साकडे घालण्यात आले होते, असे प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

व्यवसाय मार्गदर्शन वर्गाची पाहणी
सुप्रिया सुळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या कुटुंबातील माहिती जाणून घेतली. तसेच भविष्यात कोणतीही गरज भासल्यास संपर्क साधणचे आवाहन त्यांना केले. सलाम बॉम्बे फाउंडेशन व पुणे महानगरपालिका यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या संगणक हार्डवेअर व्यवसाय मार्गदर्शन वर्गाची पाहणी केली. या कोर्सच्या तासिका वाढवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. सुळे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना मुनाफ शेख, ज्योती सोलनकर, निशा चव्हाण, ऋतुजा इजगुडे, आदित्यराज मोहिते या विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत रामचंद्र पाटील, सूत्रसंचालन सुनिल मोहिते व प्रिया भोंग तर माणिक जाधव यांनी आभार मानले.