शिक्रापूर । सध्या देशामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी उद्योजक बनण्याच्या दृष्टीने योग्य ती वाटचाल करावी, असे प्रतिपादन पुणे-नगर इंडस्ट्रीयलचे प्रकाश धोका यांनी केले. शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला येथे रोटरी क्लब शिक्रापूर, रोटरी क्लब हडपसर, रोटरी क्लब कात्रज, रोटरी क्लब इंस्पिरा, एमेनोरा एस फाउंडेशन यांच्या वतीने तसेच साई पॅथोलॉजिक लॅब्रोटरी शिक्रापूर यांच्या सहकार्याने प्रशालेतील पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन, रक्तगट तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी धोका बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच जयश्री भुजबळ, रोटरी क्लब शिक्रापूरचे संस्थापक वीरधवल करंजे, अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड, प्रा. संजय देशमुख, प्रा. संजीव मांढरे, लद्धाराम पटेल, पोपट पालवे, विभाकर रामतीर्थकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
शाळेला 51 हजाराची देणगी
युवतींना हिमोग्लोबिन कमी व जास्त होण्याची कारणे, लक्षणे तसेच उपचार याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. धनंजय लोंढे यांनी मार्गदर्शन केले. तर यावेळी शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे शाळेसाठी शौचालयाची गरज असल्याचे प्राचार्य गद्रे यांनी सांगितले. यावर प्रकाश धोका यांनी 51 हजार रुपयांची देणगी देत यापुढील काळामध्ये देखील मदत करणार असल्याचे जाहीर केले. रोटरी क्लबच्या वतीने देखील शाळेच्या शौचालयासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी केले व प्रास्ताविक प्रशालेचे उपप्राचार्य रामदास शिंदे यांनी केले तर प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी आभार मानले.