विद्यार्थ्यांनी चोरले गेम खेळण्यासाठी शाळेतील कॉम्प्युटर

0

पिंपरी चिंचवड : कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी तीन विद्यार्थ्यांनी शाळेतील कॉम्प्युटर चोरल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. बुधवारी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतून दोन कॉम्प्युटर चोरल्याची कबूली दिली. पिंपरी-चिंचवडच्या यशवंत चव्हाण विद्यालयात तीन आठवड्यांपूर्वी कॉम्प्युटर चोरीची घटना घडली होती.

कुलूप तोडून लॅबमध्ये प्रवेश…
शाळेतील दोन माजी विद्यार्थी आणि सध्या इयत्ता 9 वी वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने लॅब मधून दोन कॉम्प्युटर चोरले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्याने कॉम्प्युटर चोरल्याचे उघड झाले. या तिघांना कॉम्प्युटर गेमचे वेड होते आणि यातूनच ही चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. रात्री उशिरा कुलुप तोडून या तिघांनी शाळेच्या लॅबमध्ये प्रवेश केला होता. चोरी केल्यानंतर यातील एक कॉम्प्युटर शाळेतील माजी विद्यार्थ्याच्या घरी होता. तर दुसरा कॉम्प्युटर नववीत शिकणार्‍या मुलाच्या घरात सापडला. दोन हजारात कॉम्प्युटर खरेदी केल्याचे त्यांनी कुटुंबीयांना पटवून सांगितले होते. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांच्या सहकार्यांनी ही चोरी उघडकीस आणली.