सांगवी : जुनी सांगवी येथे नागपंचमीनिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीतर्फे सापांविषयी माहिती, समाजात असलेले समज आणि गैरसमज याविषयीचे निरसन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साप माणसाचा मित्र कसा; सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचार कसा करावा; यासारख्या प्रश्नांची यावेळी उकल करण्यात आली.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बांठिया, गीता पिल्ले, तेजल कोळसे-पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, मंडूल, एकेरी, धामण, रनेल, पोवला, चापडा, मांजया, रेती, सिलिनी, उडता सोन सर्प, स्वानमुखी, झिलाण, हरणतोल, अजगर अशा विविध जातींच्या सापांची छायाचित्रे लावण्यात आली होती. या सापांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
सामाजिक संस्थेचे सहकार्य
सांगवीतील वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. सापांच्या विविध जाती, आपल्याकडे आढळणारे सापांचे प्रकार, विषारी व बिनविषारी साप कोणते, सापांपासून घ्यावयाची काळजी, सर्पदंशानंतर करावयाचे तातडीचे प्रथमोपचार व उपचार याबाबत समर्पक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.