विद्यार्थ्यांनी दररोज वाचनासाठी 1 तास देण्याची गरज

0

शिरपूर । दि शिरपूर एज्युकेशन संचलित ए.आर.पटेल (सी.बी.एस.ई) स्कूलमध्ये ‘वाचन सप्ताह’ 20 ते 27 नोव्हेंबर या पंधरवडात राबवण्यात आला. ‘वाचन पंधरवडाचे’ उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य, निश्चल नायर यांनी विद्यार्थ्यांसमोर एका पुस्तकातील कथा वाचून केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना वाचनाचे महत्व सांगितले ते म्हणाले की, वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होत. कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यास खतपाणी मिळते.

कागदी फलक चिकटवून वाचन
पहिल्या दिवशी परीपाठात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनी युक्ता चौधरी व युती जैन व इयत्ता 7 वी च्या विद्यार्थिनी रेवती पाटील, शाल्वी माहेश्वरी यांनी स्वलिखित कवितेचे प्रकट वाचन केले. तसेच माध्यमिक विभागात, ग्रंथालयातील विद्यार्थ्यांच्या आवडीचे विविध पुस्तके देऊन ‘वाचन उपक्रम’ राबवला. यात विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी संपूर्णपणे 1 तास वाचन करण्यास सांगितले. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल व विविध प्रकारच्या पुस्तकांचीही ओळख होईल. इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सुविचार लेखन, सुभाषित लेखन,करून कागदी फलक स्वतःच्या पाठीला चिटकून एकमेकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मोठ्या उत्साहात व आनंदात सहभाग घेतला. ‘वाचन पंधरवडा’ यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य, निश्चल नायर यांनी मार्गदर्शन केले व इंग्रजी विभागाचे शिक्षक लोकेश सूर्यवंशी, राजेंद्र पाटील तसेच फराह खान, लिना दे, आभेरी बोस, सिमा लिलाडे, प्रिया ठाकूर, निलेश चोपडे यांनी कामकाज पाहिले.