विद्यार्थ्यांनी फुले, आंबेडकरांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी

0

पिंपरी : महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व सामन्यांबरोबरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने फुले-आंबेडकर जयंती महोत्सवादरम्यान शहरातील विद्यार्थ्यांसाठी या दोन महापुरूषांवर आधारित चित्रपट मोफत दाखविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्याना या महापुरुषांच्या जीवन कार्याची माहिती मिळेल व त्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असे मत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी व्यक्त केले.

या मान्यवरांची उपस्थिती
महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचा समारोप पिंपरीतील एच. ए. मैदानावर तथागत या महानाट्याच्या प्रयोगाने झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर नितीन काळजे, आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंगोळकर, माजी नगरसेवक भीमा बोबडे, मुख्य संजोजक तथा सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर, वसंत साळवी, शरद जाधव, संजय कांबळे, संजय भोसले आदी उपस्थित होते.

अनेक कार्यक्रम संपन्न
किरण व शैलेंद्र बागडे निर्मित सुमारे 150 कलावंतांचा सहभाग असणार्‍या तथागत या महानाट्य प्रयोगाला हजारो रसिक उपस्थित होते. त्यापूर्वी प्रसिद्ध गायक राहुल सक्सेना यांचाही प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम झाला. त्यांचे स्वागत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे व पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. किरण व शैलेंद्र बागडे यांचा सन्मान महापौर नितीन काळजे व आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कामगार नेते व जयंती महोत्सव सुरू करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या निवृत्ती आरवडे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.