विद्यार्थ्यांनी बनविल्या कागदापासून पिशव्या

0

आयआयसीएमआरचा नाविन्यपूर्ण उपक्रम

निगडीः प्लास्टिक बंदीचा निर्णय आणि विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या मार्गदर्शनासाठी निगडीतील औद्योगिक तंत्र शिक्षक संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रिअल अँड कम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयआयसीएमआर) च्या एमसीए विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात कॉलेजचे प्राध्यापक अस्मिता चौधरी, मेघा देसाई, रुपाली भंगाळे, प्रिथा प्रसिध, स्वीटी चव्हाण, वंदना पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. तर, किरण शिंदे, प्रिया देशपांडे, संजय मते यांनी या उपक्रमाचे परिक्षण केले. ऑक्सिजन नावाचा गट प्रथम पारितोषिक विजेता ठरला.

कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण
आयआयसीएमआरच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी या उपक्रमाची माहिती देताना म्हणाल्या की, एमसीए कोर्समध्ये विविध उपक्रमातून जास्तीत जास्त गोष्टी कशा शिकवता येतील, याचा आम्ही कायम विचार करतो. त्याप्रमाणे प्लास्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. प्राध्यापक संजय मठपती यांनी विद्यार्थ्यांना रद्दीपासून वेगवेगळया आकाराच्या पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना गटामध्ये विभागण्यात आले. प्रत्येक गटासाठी एक प्रशिक्षित शिक्षक देण्यात आले. पिशव्या बनवण्यासाठी प्रत्येक गटाला स्टेपलर, डिंक, चिकट पट्टी, पंचिंग मशिन साहित्य कॉलेजतर्फे देणयात आले.

पिशव्यांची एका तासात विक्री
बनविलेल्या पिशव्यांच्या विक्रीसाठी जाहिरात व प्रत्यक्ष विक्रीचा भाग या उपक्रमात होता. जाहिरातीसाठी फेसबुकचा वापर करण्यात आला. तसेच, बाहेर जाऊन विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पिशव्या एका तासात विक्री करून प्रत्येकी गटांनी 300 ते 500 पिशव्यांची ऑर्डर आणली. मेडीकल शॉप, भाजी विक्रेते, किरणा दुकाने अशा ठिकाणी पिशव्या विक्री केल्या.