विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘रंगतरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलन
जळगाव- वाघनगर परिसरातील विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल व सेमी विभागाच्या ‘रंगतरंग’ या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसर्या दिवशीही माध्यमिक विभागातील 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची उधळण करीत जल्लोष केला. मराठी, पावरी, पंजाबी, तामिळ, राजस्थानी लोकनृत्य सादर करत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थितांन ठेका ठरला होता.
स्नेहसंमेलनाच्या दुसर्या दिवसात सुगम गायन, एकपात्री नाटक, समूह नृत्य या कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये सुगम गायन या कला प्रकारात गोमू माहेराला जाते हो नाखवा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, देहाची तिजोरी, तू वेडा कुंभार, कानडा राजा पंढरीचा, विठू माऊली तू या प्रकारची गीते विद्यार्थ्यांनी सादर केली व या गीतांना उपस्थित पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी भर भरून प्रतिसाद दिला.
एकपात्री नाटकाने उपस्थितांना खदखदून हसविले
एकपात्री नाटक या कला प्रकारात पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या लिखाणावर व्यक्ती आणि वल्ली (नारायण), असा मी असा मी (शेजार्यांशी भांडण), ती फुलराणी (मंजुळा), व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा), व्यक्ती आणि वल्ली (हरी तात्या), व्यक्ती आणि वल्ली (चितळे मास्तर) अशा विषयावर सहभागी विद्यार्थ्यांनी एकपात्री नाटकाच्या विनोदी भूमिकांतून उपस्थितांना खदखदून हसवले. स्पर्धेसाठी महिमा जैन, सुषमा प्रधान, संगीता घोडगावकर व साक्षी माळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण
कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रविलास ओझा, उद्योगपती संजय सोनवणे, प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, सेमी इंग्लिश विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यशस्वितेसाठी समन्वयक गणेश लोखंडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.