विद्यार्थ्यांनी विचार विनिमय, संघभावना व बंधुभाव अंगिकारावा

0

श्रीनिवास पाटील : एमआयटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभ

पुणे : वेगाने बदलत जाणारी जागतिक अर्थव्यवस्था लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. तसेच, कॉर्पोरेट जगात होणार्‍या मोठ्या प्रमाणातील परिवर्तन लक्षात घ्यावे. यासाठी विद्यार्थ्यांनी विचार विनिमय, संघभावना, बंधुभाव आणि आपापसातील परस्पर संबंध विकसित करणे महत्त्वाचे आहे, असे विचार सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआयटी व एमआयटी कॉलेज ऑफ इंजीनियरींगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वसुंधरा-2019 या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, प्रा.राहुल कराड, कुलगुरू डॉ. आय.के.भट, प्रा. प्रकाश जोशी, प्रा.शरदचंद्र दराडे-पाटील, सारंग पाटील, प्राचार्य डॉ.एल.क्षीरसागर, डॉ. रामचंद्र पुजेरी, प्राचार्य डॉ. अनिल एस. हिवाळे, डॉ. श्रीहरी होनवाड, डॉ. एम.वाय. गोखले, सौरभ सांगळे, शुभम भुटारे व रूजूल वाळवेकर उपस्थित होते.

जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास

डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, भारतीय परंपरेमध्ये ज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय आहे. तसेच स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार 21व्या शतकात भारत संपूर्ण जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येणार आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितले की, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे सूत्र विद्यार्थ्यांनी सतत ध्यानात ठेवावे.
प्रा. राहुल कराड म्हणाले, एमआयटीच्या माध्यमातून एक उत्तम प्रकाराचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यातूनच विद्यार्थी जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो.

‘बेस्ट आउट गोईंग’ पारितोषिक

यावेळी एमआयटीची देवश्री भरातीया आणि सीओईचा विद्यार्थी निसर्ग पाटील यांना ‘बेस्ट आउट गोईंग’ पारितोषिक मिळाले. एकलव्य श्रम पुरस्कार राजेंद्र जगताप आणि सर्जेराव ढमाले यांना प्रदान करण्यात आला. विविध शाखेत उत्तुंग कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.