विद्यार्थ्यांनी साकारल्या गणरायाच्या विविध मूर्ती

0

येरवडा । खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयातील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्याने शिक्षक-पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयात यावर्षी देखील हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उत्साहात सहभाग घेतला होता. पर्यावरणाचा संदेश फक्त अभ्यासक्रमात मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात अवलंबला जावा याची मुहूर्तमेढ विद्यार्थी जीवनात रोवली जावी. या हेतूने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी दिली. शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाच्या मूर्ती साकारताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. आपल्या हातून गणेशाची मूर्ती साकारताना प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा उत्साह दिसून येत होता. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, शालेय समिती अध्यक्षा अलका पाटील,उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले, सविता ढेरंगे, राजू सोमवंशी, शुभांगी महापुरे, राजेश दरेकर, शशिकला रोहोकले, लीना पवार, वैभव सावंत, सुनीता गोरे यांनी विशेष प्रयत्न केले.