विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलागुण

0

घोलप महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

नवी सांगवी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन मंगळवारी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख हे होते. कार्यक्रमासाठी इंडियन आयडॉल पार्श्‍वगायक संदीप उबाळे, राष्ट्रीय कबड्डीपटू विराज लांडगे, संस्थेचे प्रशासन सचिव ए. एम. जाधव , प्राचार्य बाळकृष्ण झावरे, प्रसिद्ध उद्योगपती अभिजित शिर्के, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद जाधव, उपाध्यक्षा प्रियांका भोसले, राहुल जवळकर, वैशाली जवळकर, उपप्राचार्य डॉ. एस. के. धागे, डॉ. लतेश निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतो. प्रमुख पाहुणे म्हणून विराज लांडगे, पार्श्‍वगायक संदीप उबाळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आयुष्यामध्ये तनमन झोकून काम केले तर त्याचा आनंद घेता येईल. काम कोणतेही असो ते कमी दर्जाचे मानू नये. नवनवीन गोष्टी शिकण्याची उर्मी मात्र सोडू नये. यासोबतच आपल्या आयुष्याला आकार देणार्‍या आई-वडिलांचा आणि गुरुजनांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. त्यांच्यामुळेच जीवन यशस्वी करता आले. हे या प्रसंगी व्यक्त केले. आजचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांना आपल्या संधीचे सोने करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा फायदा घेण्याचे आवाहनही या प्रसंगी त्यांनी केले.

मौलिक ठेवा मिळतो
संस्थेचे प्रशासन सचिव जाधव म्हणाले की, महाविद्यालयीन जडण-घडण वैशिष्ट्यपूर्ण असते. ही संधी दवडता कामा नये. कारण मौलिक जीवनाचा ठेवा महाविद्यालयाकडून मिळत असतो. आजच्या संगणक युगात संगणक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कठोर परिश्रमातून यशाची प्राप्ती होते. याची जाणीव लवकर झाली तर जीवनातील प्रत्येक पाऊल आपल्या यशस्वितेचे असेल. या प्रसंगी पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना उत्तेजन मिळावे या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून देते आपली संस्कृती आणि परंपरा, नाविन्यपूर्ण कला, स्वच्छतेचा संदेश देणारे नृत्य, एकांकिका सामाजिक विषयांचे प्रश्‍न मांडले.

कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. एन. एस. गिरी, शारीरिक संचालिका प्रा. विद्या पठारे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा खोडदे, डॉ. नंदा राशिनकर, डॉ. माया माईनकर, सुरज गदादे यांनी केले. आभार डॉ. सी.पी. हासे यांनी मानले.