भुसावळ । आजच्या पिढीतील बरेच विद्यार्थी लहानपणापासूनच सोशल मीडीया आदी माध्यमांच्या नादात लागले असुन विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिल्यास शैक्षणिक क्रांती शक्य असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. ते आज 25 रोजी खडका रोड भागातील एम.आय. तेली इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा गटनेते तथा संस्थाध्यक्ष हाजी मुन्ना तेली हे होते.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
पालकांचाही पाठिंबा आवश्यक
यावेळी युवराज लोणारी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करुन स्पर्धा परिक्षांकडे वळल्यास अधिकारी पदावर जाण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. संस्थाध्यक्ष मुन्ना तेली यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,अल्पसंख्यांक समाजात भुसावळ शहरात एकही इंग्रजी माध्यम शाळा नसल्याने या शाळेची स्थापना केली होती. जास्तीत जास्त अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न सुरु आहे. सर्वांच्या सहकार्याने संस्थेतील विद्यार्थ्यांना दोन राष्ट्रपती पुरस्कार मिळाले तसेच शैक्षणिक व क्रिडासह विविध क्षेत्रात यश मिळाले. डिजीटल इंडिया नुसार बदल घडविण्यासाठी प्रयत्न राहील. शाळेतील विद्यार्थी कापीमुक्त असुन त्यात पालकांचाही पाठिंबा मिळत आहे. लवकरच स्पर्धा परिक्षा सुरु करण्यात येईल असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक हाजी साबीर शेख, शेख रहीमोद्दीन, सुलेमान तडवी, आशिक तेली, याकुब मौलाना, प्राचार्य वाजीद अली यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.