पिंपरी-चिंचवड। विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित झाल्यास आपल्या देशाची खर्या अर्थाने प्रगती होऊ शकते, असे प्रतिपादन बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित व डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सहआयोजक असलेल्या ’डिपेक्स- 2017’ अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात ‘स्टार्टअप’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गायकर बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या स्टार्टअप समितीचे अध्यक्ष संजय इनामदार व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास गायकर, डॉ. सोमनाथ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते संजय इनामदार यांनी ‘स्टार्टअप’साठी एआयसीटीई राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थी महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांना उद्योजकतेचे धडे देण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी फेसबुक, गुगल या कंपनीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्यास इनामदार यांनी सांगितले. कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असंख्य कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे कौतुक
डॉ. सोमनाथ पाटील यांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकसित करण्यासाठी चालत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाचे बरेच विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राबवित असलेल्या विविध विद्यार्थीभिमुख कार्यक्रमाचे कौतुक केले.