जळगाव। खाजगी शाळा व शासकीय शाळांमध्ये स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांची होरपळ होत असतांना दिसून येते. याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांचा दप्तराचा ओझा वाढला आहे. त्यामुळे बालवयात शाळकरी मुलांना शारिरीक समस्या जाणवायला लागल्या आहेत. दप्तराच्या ओझ्याखाली त्यांचे बालपण चिरडले जात आहे. विद्यार्थ्यांना दररोजच्या तासीकेसाठी आवश्यक त्याच शालेय साहित्य सोबत ठेवण्याच्या सुचना देण्यात याव्या तसेच दप्तराचे ओझे कमी करावे अशी मागणी जिल्हा परिषद आणि शिक्षण समिती सदस्या माधुरी अत्तरदे यांनी केली आहे.
मागणीचे निवेदन त्यांनी शिक्षण सभापती पोपट भोळे यांना दिले आहे. महिन्यातुन एक वेळा गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे तपासावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच दप्तराचे ओझे अधिक आढळल्यास संबंधीत शाळांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी सभापती यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांनी सभापती यांच्याशी विविध प्रश्नावर चर्चा केली.