निगडी : विद्यार्थ्यांवर शिस्तीतून संस्कार रुजविले पाहिजेत. स्वत:सोबत कुटुंबाला शिस्त लावल्यास संस्काराचे बीज कुटुंबातूनच विद्यार्थ्यांवर होतील. टीव्ही, मोबाईलच्या आभासी विश्वातून स्वत:ला पहिले सावरले पाहिजे. आई हा मुलांचा पहिला गुरू असतो. संस्काराचे बीज आईनेच मुलांच्या मनावर रुजवावे. शाळा त्या गुणांना आणखी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करते, असे प्रतिपादन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव शरद इनामदार यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे उपसचिव शरद इनामदार, रुपाली जोशी, सुजाता ठोंबरे, प्रभाकर कळमकर, मुख्याध्यापक गोकूळ कांबळे, पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, नियामक मंडळ सदस्य राजीव कुटे, शोभा फटांगरे, ऋतुजा सूर्यवंशी, आशा कुंजीर आदींची उपस्थिती होती.
गुणवंतांचा सत्कार
या सभेस प्रशालेचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी पालकांमधून चालू शैक्षणिक वर्षाची पालक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्षा म्हणून रुपाली जोशी यांची तर सचिव सुजाता ठोंबरे, उपसचिव म्हणून प्रभाकर कळमकर यांची नियुक्ती करण्यात आली. आशा कुंजीर यांनी अहवाल वाचन केले. इयत्ता दहावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यादी वाचन मनीषा बोत्रे, सूत्रसंचालन अमोल नवलपुरे तर जयश्री देसाई यांनी आभार व्यक्त केले.