पोलादपूर : तालुक्यातील चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये स्थापनेपासून पहिल्यांदाच तब्बल 17 वर्षांनंतर कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले असता केवळ 27 पदवीधर माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रतिसाद लाभला. पोलादपूर येथे सुरू झालेल्या सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये आजपर्यंत हजारो विद्यार्थी पदवीधर होऊन पुढील शिक्षणासाठी अथवा नोकरी व्ववसायासाठी स्थलांतरीत होऊन गेले. मात्र, असंख्य विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीची संधी न मिळाल्याने ते वंचित राहिले असल्याची खंत दिसून आल्याने टीव्हीएस या कंपनीमार्फत या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थिनींनी गेल्या काही वर्षांपूर्वी या महाविद्यालयामधून बीएस्सी उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरव्ह्यू शहरात होत असल्याने नोकरीची संधी मिळविणे शक्य झाले नाही. मात्र, आमच्याच कॉलेजमध्ये जिथे आम्ही पदवीधर झालो तिथेच ही इंटरव्ह्यूची संधी असल्याने आम्ही आत्मविश्वासाने इंटरव्ह्यूला सामोरे जात असल्याचे सांगितले.