तहसिलदार शिवाजी जाधव यांची क्रीडा स्पर्धेत ग्वाही
पोलादपूर – तालुक्यातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय पातळीवर पोहाचत असताना ते याहीपुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत यासाठी क्रीडासंकुलाची आवश्यकता आहे. मात्र, सरकारी जमीन उपलब्ध नसल्याने त्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य केल्यास योग्य तो मोबदलाही देण्याची तरतूद करण्यात येईल. मात्र, येत्या दीड दोन वर्षात क्रीडासंकुलाला प्राधान्य देऊन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पोलादपूरचे तहसिलदार शिवाजी जाधव यांनी येथे दिली. चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षीय भाषणात तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार शिवाजी जाधव बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सभापती दिपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमन कुंभार, पं.स. सदस्य यशवंत कासार, गटविकास अधिकारी डॉ.भूषण जोशी, गटशिक्षणअधिकारी साळुंखे, उपप्राचार्य सुनील बलखंडे, सडवली सरपंच संजय कदम, शालेय पोषण आहार अधिक्षक सुभाष कुरणे, विविध शाळांचे मुख्याध्यापक क्रीडाशिक्षक तसेच मान्यवर उपस्थित होते.
1 कोटी रूपयांचा निधी परत गेला
गेल्या जुलै महिन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी आणि स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये क्रीडा संकुल होण्यासाठी झालेल्या बैठकीला तालुका क्रीडा समितीचा अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना झालेल्या चर्चेनुसार क्रीडासंकुलासाठी आवश्यक तीन एकर जमीन सलग न मिळाल्यास दोन वेगवेगळया ठिकाणीही विकत घेता येऊ शकेल की, ज्यामुळे इनडोअर आणि खुल्या मैदानी खेळांना चालना देणे शक्य होऊ शकेल. यापूर्वी ही तालुकास्तरीय क्रीडासंकुलाची योजना सुरू झाल्यापासून सरकारी जमिनीअभावी प्रस्ताव न गेल्याने यासाठीचा सुमारे 1 कोटी रूपयांचा निधी परत गेल्याची खंत वाटत असून यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या वरकस माळरान मालकी जमिनी ज्या रस्त्यालगत येऊ शकतील अथवा रस्ता तिथे आहे अशा जमिनींचे प्रस्ताव तहसिल कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेटून दिल्यास हे काम निश्चितच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.