विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दारोदारी

0

चाळीसगाव (अमोल पाटील) । तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या केवळ विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या शुल्कावर सुरु असतात. त्यांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. पालकांकडून मिळणारी फी हेच त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन असले तरी या शाळांत वाढलेल्या स्पर्धेमुळे मराठी शाळांचे धाबे दणाणले आहे. असे असले तरी इंग्रजी शाळामध्ये शासनाच्या नियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना 25 टक्के राखीव असल्याने इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळू लागला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांची वाढती संख्येमुळे विद्यार्थी टिकविणे महत्वाचे असल्याने शाळेतील शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट असल्योन कडाकाच्या उन्हातही शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत आहे. संस्थेबद्दल माहिती देत आपलीच शाळा कशी योग्य आहे हे पालकांना पटवून देतांना दिसत आहे.

इंग्रजी शाळेकडे कल
दिवेसेदिवस इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे. आपल्या मुलाने इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यावे असे प्रत्येक पालकांना वाटायला लागले आहे. त्यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये कायम विना अनुदान या तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच प्रवेश घेतांना फी वसूल होत असल्यामुळे आर्थिक चणचण संस्था चालकांना भासत नाही. त्यात शाळेचा गणवेश व पुस्तक हे पालकच स्व:खर्चाने घेत असल्यामुळे संस्थाचालकावर त्याचा बोझ पडत नाही.

तालुक्यात 263 शाळा
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 134 प्राथमिक, इंग्रजी माध्यमाच्या 17, खाजगी हायस्कुल व आश्रम 78, मराठी व उर्दू माध्यमाच्या 34 अशा एकूण 263 शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या 17 शाळा तालुक्यात व शहरात आहेत पालकांचा जिल्हा परिषद शाळेऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढला. जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी संख्या घटत असल्याने शिक्षकांना अन्यत्र शाळेत समायोजन होण्याची वेळ आली.

मोफत शिक्षण
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याअंतर्गत प्रवेश झालेल्या बालकांच्या प्राथमिक शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी शासनातर्फे घेण्यात येते. या तरतुदी अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना मोफत खाजगी इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेश मिळू लागला. शाळांच्या सुविधा आणि गुणवत्तेची माहिती घरबसल्या मिळत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे कमी शुल्कातही प्रवेश दिले जात आहे.

झेडपी शाळा टिकविणे अवघड
भविष्यात मराठी शाळांना येणारा संभाव्य धोका लक्षात घेता तालुक्यातील बर्‍याच प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतरीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी ओहटीला लागाम लागला. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यादृष्टीने शाळांचा दर्जा वाढविण्यास प्रारंभ केला. लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करणे, इंग्रजी शाळांमधील सुविधा, संगणक कक्ष, अत्याधुनिक क्रीडा साहित्य, शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेहसंमेलन, पालकांचे नियमित मेळावे आदी उपक्रम राबविले जात आहे.