विद्यार्थ्याकडून विद्यापीठाला आत्मदहनाचा इशारा

0

मुंबई । मुंबई विद्यापीठाच्या निकालाला दिरंगाई होत असल्याने तसेच विद्यापीठाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थांचे भवितव्य अंधारमय होत असून त्यांच्यात कमालीचे नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलून धाडस करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षात शिकणारा अभिषेक प्रवीण सावंत (25) हा विद्यार्थी कार्यकर्ता विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे त्रस्त असून या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या कुलगुरूंना लेखी पत्र लिहून आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विधी विभागाच्या गेल्या सत्रातील निकाल 120 दिवस उलटून देखील लागलेला नाही तसेच इतर अनेक विभागांचे निकाल देखील रखडलेले आहेत. निकाल दिरंगाईबाबत अनेकदा विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली तरी विद्यापीठाला आंदोलनाची दखल घेता आली नाही. 14 एप्रिल 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगात गौरविण्यात आलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी विद्यापीठाच्या आवारात अभिषेक सावंत याने राज्याचे मुख्यमंत्री आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याची हेळसांड
अनेक आंदोलने करून जर विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नसेल तर या कुंभकर्णी अवस्थेत गाढ झोपी गेलेल्या विद्यापीठाला व शासनाला जाग यावी या भूमिकेतून मी आत्मदहन करणार असल्याचे अभिषेक सावंत याने प्रतिक्रिया देताना सांगितले. दरम्यान मुंबई विद्यापीठाचा 2017 सालचा निकालाचा गोंधळ त्यानंतर 2018मध्ये पुढील वर्षाच्या अंतिम परिक्षांची वेळ आली तरी अजून सर्व निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे मागील वर्षाचा निकाल लागलेला नाही, मात्र तरीही पुढच्या वर्षीच्या परीक्षा बसणारे हजारो विद्यार्थी आहेत. ज्यांना निकालाची प्रतिक्षा लागलेली आहे. जर उत्तीर्ण झालेले असल्यास चालू वर्षाची परिक्षा देऊन काय उपयोग असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे.