कल्याण : कल्याण डोंबिवलीत भुरट्या चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी विजयनगर शिवाजी कॉलनीमध्ये राहणारा सुनील चव्हाण हा विद्यार्थी बुधवारी दोन वाजण्याच्या सुमारास मॉडेल कॉलेज येथे अॅडमिशन फॉर्म जमा करण्यासाठी जात असताना समोरून येणार्या एका अज्ञात इसमाने त्याच्या हातामधील मोबाइल हिसकावून पळ काढला. सुनीलने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चोरटा क्षणार्धात पसार झाला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस हवलदार काटकर यांनी दिली.