विद्यार्थ्याची पकडली कॉपी, निघाली सुसाईड नोट

0

औरंगाबाद । दहावीच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची कॉपी पकडण्यात आली. मात्र ती कॉपी वाचून सर्वच हादरून गेले. कारण ती कॉपी नव्हती तर ती होती सुसाईड नोट. मात्र पोलिसांनी वेळीच प्रकरण योग्य पद्धतीने हाताळल्याने त्या विद्यार्थ्यांचा जीव वाचला. या प्रकरणी पोलीस निरीक्षकांनी समुपदेशन करत विद्यार्थ्याची समजूत काढली. त्यामुळे मुलगा घरी जाण्यास तयार तर झालाच, शिवाय विद्यार्थ्याने आत्महत्येचा विचार सोडून भविष्यात पोलीस निरीक्षक होणार असे बोलून देखील दाखवले. यावेळी सर्व गहिवरून गेले होते.

ही घटना आहे औरंगाबादेतील गोरकेडा परिसरातील. या परिसरात असणार्‍या माध्यमिक कन्या विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षार्थ्यांकडील कॉपी तपासण्याचे काम शिक्षक करत होते. दरम्यान, शिक्षकांना मोहन या 15 वर्षांच्या मुलाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यांनी कॉपी म्हणून ती उघडून बघितली. मात्र ती कॉपी नसून सुसाईड नोट निघाली. त्यात लिहीले होते की, माझी आई आणि मामा मारहाण करतात. रेल्वे पटरीवर जाऊन जीव दे म्हणतात. मी खरेच आत्महत्या करणार आहे.

शिक्षकांनी ही बाब ताबडतोब बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी रणजित सुलाने यांच्या निदर्शनास आणून दिली. सुलाने यांनी ही बाब गांभीर्याने घेत मोहनला समजावून सांगून पेपर सोडवण्यास सांगितले. तसेच पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनाही या प्रकाराबाबत सांगितले. मोहनची त्यांनी खूप समजूत घातली, पण त्याने मला कुठेही पाठवा मात्र मी घरी जाणार नाही, असा पवित्रा घेतला. मुदिराज यांनी त्याच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर मुलगा घरी जाण्यास तयार झाला.

मोहनचे वडील टेम्पोचालक आहेत. मोहन अभ्यास करत नाही, काम करत नाही, अशी तक्रार त्याचे आई-वडील करत होते. त्यातून विद्यार्थ्याने आत्महत्येचा विचार केला होता. मात्र पोलिसांच्या समुपदेशनाने मोहनला जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे.