मु.जे.महाविद्यालयातील घटना ; मयत मुकेशवर पोलीस बंदोबस्तात असोदा येथे अंत्यसंस्कार ; रामानंदनगर पोलिस निरिक्षकांची उचलबांगडी
जळगाव- शहरातील मू.जे. महाविद्यालया दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दहा ते 15 जणांसह मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे वय 23 याच्यावर चॉपरने वार करुन त्याचा खून केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली होती. शनिवारी विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी रात्री पारोळा येथून इच्छाराम पुंडलिक वाघोदे रा. समतानगर याला ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर रात्रीच पुण्यातून पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील फरार झालेल्या अरुण बळीराम सोनवणे रा. समतानगर , तुषार नारखेडे रा. रामानंदनगर, किरण हटकर रा. मोहाडी रोड, नेहरु नगर व मयुर माळी व समीर सोनार या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयात भरदिवसाच्या खूनाच्या घटनेने जळगावसह जिल्हा हादरला होता. संशयितांना पकडण्याच्या प्रयत्नात मुकेशचा भाऊ रोहितवरही चॉपरने वार झाला होता. चुकविण्याच्या प्रयत्नात मानेवर जखम झाली होती. या घटनेनंतर कुटुंबियांनी आक्रमक पावित्रा घेत संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास तसेच शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबियांची भेट घेवून त्यांची सात्वन केले होते.
खूनानंतर तडकाफडकी निरीक्षकांची उचलबांगडी
खूनाच्या घटनेनंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या भरदिवसा महाविद्यालायत घडलेल्या घटनेमुळे रामानंदनगर हद्दीत गुन्हेगारीवर पोलीस निरिक्षकांचे नियंत्रण नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रात्रीच आदेश काढून तडकाफडकी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपक बुधवंत यांची नियंत्रण कक्षात बदली केली. पोलीस निरिक्षकांचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्याकडे देण्यात आला असून खुनाच्या गुन्ह्याचा तपासही सचिन बेंद्रे हेच करीत आहेत.
पोलीस बंदोबस्तात मुकेशवर असोदा येथे अंत्यसंस्कार
शवविच्छेन करावे व मृतदेह ताब्यात घ्यावा, मंत्र्यासह आमदारांनी मयत मुकेशच्या कुटुंबियांची समजूत घातली होती. सामाजिक कार्यकर्ते रवी देशमुख तसेच कार्यकर्ते कुटुंबियांसह रविवारी 10.30 वाजता जिल्हा रुग्णालयात आले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात आसोदा येथे नेण्यात आला. तेथेही कडेकोट बंदोबस्तात मुकेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक आरसीपी प्लाटून व तालुका पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुण्यात जळगावच्याच मित्रांकडे पोहचले संशयित
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना संशयितांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले.संशयितांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारीच मुंबई, सुरत तसेच पुणे अशा विविध ठिकाणी सहा ते सात पथके रवाना झाली होती. हल्ला केल्यानंतर पाचही संशयित मोबाईल बंद करुन रेल्वेने पुण्याला पसार झाले. येथे शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेल्या प्रतापनगरातील मित्र कार्तिक चौधरी याच्याशी संशयितांनी संपर्क साधला. व त्याच्याकडे वास्तव्यास राहिले. संशयित पुण्याला असल्याची माहिती मिळताच रात्रभर जागून पथकाने पुणे गाठले. सिंहगड भागातून पाचही संशितयांना ताब्यात घेवून पथक पुन्हा जळगावला पोहचले.
संशयितांमध्ये एक पोलिसाचाच मुलगा
पथकाने पुण्याहून ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये अरुण बळीराम सोनवणे, तुषार नारखेडे, किरण अशोक हटकर (रा.नेहरु नगर, जळगाव), मयुर माळी, समीर सोनार, यांचा समावेश आहे. यातील समीर मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचार्याचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी पथकाने पारोळा येथून इच्छाराम पुंडलिक वाघोदे (रा.समता नगर) ताब्यात घेतले होते. अशाप्रकारे 24 तासातच पोलिसांनी गुन्ह्यात सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटकेतील वाघोदेला रविवारी सकाळी जिल्हा न्यायालयात न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. शेख यांनी इच्छाराम यास पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.