विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पाच नायजेरियनविरोधात तक्रार

0

नोएडा । नोएडामध्ये एका विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पाच नायजेरियन नागरिकांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला. मनीष खारी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो 12 वीत शिकत होता. मनीषचे वडील किरणपाल खारी यांनी कासना कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर 50 हून अधिक नायजेरियन नागरिकांनी येथील कासना कोतवाली परिसरा बाहेर निदर्शने केली. मनीषला बळजबरीने अंमली पदार्थ देण्याचा आरोप या पाच नायजेरियन नागरिकांवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान नायजेरियन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन योगी आदित्यानाथ यांनी दिले, असेही स्वराज यांनी सांगितले.

एका नायजेरियन विद्यार्थ्याने ट्विटरवरून सुषमा स्वराज यांना नोएडामध्ये नायजेरियन विद्यार्थ्यांवर होणार्‍या हल्ल्यासंदर्भात माहिती देऊन मदत मागितली होती. केंद्र सरकारला याबाबत देण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई केली जात असल्याचे स्वराज यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितले.