पुणे । शिवाजीनगर येथील विद्या प्रसारिणी सभेच्या विद्या वर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशदिन ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यांचा शाळा प्रवेशदिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळेत पाऊल पडल्यामुळे ते स्वतः सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले तसेच लाखो दलितांचे, वंचितांचे उद्धारकर्ते झाले. ते शाळेत गेल्यामुळे ज्या संविधानाचा आज आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो. त्या संविधानाचे शिल्पकार ठरले. त्यांचा शाळा प्रवेश दिन हा महत्त्वाचा आणि क्रांतीकारी घटना होय. या दिनानिमित्त शाळेत वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रेणू सुम्बली होत्या आणि प्रास्ताविक पर्यवेक्षका नूरजहान शेख यांनी केले.