साक्री । साक्री तालुक्यातील शेवाळी गाव ते भामेर गावाच्या विद्युत तारा ओढण्याचे काम सुरू असतांना 132 के.व्ही.केंद्रातून लाईन बंद करण्याचा परमिट घेऊन काम करत असतांना नितीन कैलास बोरसे (वय 22) रा.कावठे हा तरूण काम करत असतांना खांबावर विजेचा शॉक लागून मयत झाला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. कावठे येथे राहणार्या नितीन बोरसे यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी 3 जून रोजी सकाळी 9 वा.गावातून घेऊन गेले. त्यानंतर फोनद्वारे नितीन यास दिनदयाल हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले असल्याचे सांगितले. तेव्हा हॉस्पिटलमध्ये विचारणा केले असता ग्रामीण रूग्णालय येथे घेऊन गेल्याचे सांगितले. तेव्हा ग्रामिण रूग्णालयात नितीन मयत अवस्थेत आढळून आल्याची खबर शिवाजी लहू बोरसे यांनी साक्री पोलिसात दिली.
रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
नितीन बोरसे याला साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉ. शुभांगी सोलंकी यांनी तपासले असता त्यांनी बोरसे यास मृत घोषित केले. यावेळी ग्रामीण रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ग्र्रामीण रूग्णालयात वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी नितीनला घेऊन गेले त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय कोणत्याच कागदपत्रांवर सह्या करणार नसल्याचे सांगितले. नातेवाईकांची पोलिस श्रीधर एम.पाटील यांनी समजूत काढून पुढील कारवाई करण्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल तांबे यांना सांगितले. कावठे गावात नितीन मयत झाल्याची वार्ता पसरताच संपूर्ण कावठे गावातील तरूणांनी साक्री ग्रामीण रूग्णालयात गर्दी केल्याने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.