चाळीसगाव । बंद घर असल्याचा फायदा घेऊन किचनच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न 19 ते 24 मे 2017 च्या दरम्यान शहरातील विद्युत सरिता कॉलनीत झाला असून 24 रोजी घरमालक बाहेर गावाहून आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत रावसाहेब जाधव (38, रा. विद्युत सरिता कॉलनी चाळीसगाव) हे प्लॉटिंगचा व्यवसाय व इंजिनिअरिंग रिपेररिंग वर्क शॉप चालवतात ते कुट्टुबासह खाजगी कामानिमित्त 19 मे 2017 रोजी इंदोर मध्यप्रदेश येथे गेले होते.
घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश
ते घरी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी 19 ते 24 मे 2017 रोजी त्यांच्या घराच्या किचनच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूम मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने सामान अस्ताव्यस्त केले. मात्र त्यांच्या हाती काही न लागल्याने चोरटयांनी काहीही चोरी न करता तेथून पलायन केले. प्रशांत जाधव हे 24 रोजी पहाटे 3 वाजता घरी आल्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना किचनचा दरवाजा उघडा दिसून बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी सर्व तपासणी केल्या नंतर घरातील काहीही सामान चोरी गेले नसल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रेमसिंग राठोड करीत आहेत.