विद्युत सुरक्षेचे नियम पाळा; कुलरमुळे होणारे अपघात टाळा

0

जळगाव । आला उन्हाळा…उष्णतेपासुन स्वत:ला सांभाळा. विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, कुलरमुळे होणारे अपघात टाळा. कुलरचा वापर करतांना अनेकवेळा कुलरमध्ये विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेंव्हा कुलरचा सुखद गारवा अनुभवतांना सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलेे. अज्ञान, निष्काळजीपणा, फाजिल आत्मविश्वास ही अपघाताची मुळ कारणे आहेत. प्रत्येकाने वैयक्तिक दक्षता बाळगून, प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. शुन्य वीज अपघात हे आपले उद्दिष्ट आहे. कुलरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खालील बाबींचे कटाक्षाने पालन होणे आवश्यक आहे. कुलरला लहान मुले स्पर्श करू शकणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात यावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापुर्वी वीज पुरवठा बंद केल्यास वीजेचा धक्क्यापासून बचाव होवू शकतो. तसेच कुलरमध्ये वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच, हाताने कधीही कुलरला स्पर्श करु नये.

खराब झालेल्या वायरी बदला..
कुलरला नेहमी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. त्यामुळे कुलरला अर्थिंग व्यवस्थित मिळल्याने अपघाताचा धोका टाळता येतो. अपघात टाळण्यासाठी आय. एस. आय. चिन्ह आणि योग्य दर्जाची विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहेत. जुन्या वायरिंगची तपासणी करून खराब झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी. कुलरच्या पंप दुरुस्ती करण्यापुर्वी वीज पुरवठा बंद करावा. पंपास वीज पुरवठा करणारी वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करावी. वीजेचा धक्का बसल्यास त्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजुला करावे, त्वरित कृत्रीम श्वासोंश्वास देत त्या व्यक्तीला दावखान्यात दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व सन्माननीय ग्राहकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावेत. लहान मुलांना कुलरजवळ खेळण्यास मज्जाव करावा.
– बी.के.जनवीर, मुख्य अभियंता