विद्यूत तारांच्या स्पर्शाने भरलेल्या ट्रकला आग !

0

20 लाखांचा माल अर्धवट जळालेल्या अवस्थेत; यवतमाळहून भरला होता माल

एमआयडीसी पोलिसात आगीची नोंद

जळगाव । नागपूरकडून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकमध्ये ओव्हर लोड भरलेल्या कापसाचा सरकी काढलेला कच्चा माल घेवून जाणार्‍या ट्रकला आज दुपारी 12 वाजेच्या सुपारास ट्रकला बाजूला लावण्याच्या प्रयत्नात विद्युत तारेच्या स्पर्शाने झालेल्या शार्टसर्किटमुळे कापसाच्या गठोड्यांनी पेट घेतल्याने तब्बड 125 पैकी 48 गाठोडे जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेचे दोन अग्नीशमन बंबांनी धाव घेवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर परीसरातील नागरिकांनी एकच धाव घेवून आग आटोक्यात आणण्यासाठी परीश्रम घेतले.

गाडीच्या सेटींगसाठी थांबविली गॅरेजवर
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक व मालक प्रविण उदेसिंग पाटील यांनी ट्रक क्र.(एमएच 19 झेड 5389) मध्ये यवतमाळ येथील खासगी जिनींग कंपनीतून कापसाचा सरकी काढलेला कापूस प्रेसींग करून अंदाजे 180-200 प्रतिकिलो गाठोडेप्रमाणे एकुण 125 गाठोडे 12 चाकी ट्रकमध्ये घेवून जळगावकडून जात असतांना जळगाव येथील त्याच्या नविन गॅरेजवर गाडीची सेटींग करून गॅरेजवर गाडी लावू या इराद्याने ट्रकचालक प्रविण पाटील यांनी गाडी राष्ट्रीय महामार्ग क्र 6 भुसावळ रोडवरील हॉटेल गारवासमोर लावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे प्रविण पाटील यांचे सचिन अ‍ॅटोमोबाईल याचा कॉम्प्लेक्समध्ये असून दुकानाची विचारपुसही करता येईल याच्या प्रयत्नात होते.

क्षणात ट्रकने घेतला पेट
ट्रक भुसावळकडून जळगावकडे आल्यानंतर हॉटेल गारवासमोर असलेल्या नविन गॅरेजजवळ नेण्यासाठी वळणावर ट्रक नेत असतांना वर असलेल्या इलेक्ट्रिक तारांच्या शार्टसर्किटमुळे ओव्हर लोड भरलेल्या कापसाचे 125 गाठोड्यांनी भरलेल्या ट्रकला उन्हाच्या चटक्यामुळे क्षणात आगीचा भडका झाला. ट्रकने पेट घेतल्यानंतर सुरूवातीला चालक प्रविण पाटील यांनी काहीच समजले नाही. त्यांनी ट्रक बंद करून तात्काळ बाजूला झाले.

अ‍ॅग्रो टेक कंपनीने दिली ऑर्डर
यवतमाळ येथील खासगी जिनींग कंपनीकडून 180-200 प्रतिकिलोप्रमाण चार लेव्हलमध्ये 125 गाठोडे याप्रमाणे भरला. या मालाची ऑर्डर आंध्र प्रदेशातील सालतर बालाजी अ‍ॅग्रो टेक प्राईव्हेट लिमिटेड या कंपनीत जळगाव येथीलच शुभम भालचंद पाटील हे कामाला असून त्यांच्या मध्यमातून मालाची खरेदी करण्यात आली होती. यवतमाळकडून भरलेला ट्रक भुसावळकडून निघाल्यानंतर कुणीतरी बिडीफेकल्याच्या कारणावरून ट्रकला आग लागून जवळपास 20 लाखांचा माल जळाल्याची माहिती शुभम पाटील यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

सिगारेट फेकल्यामुळे आग?
याबाबत चालक प्रविण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता भुसावळकडून जळगावकडे येत असतांना हायवेवर कुणीतरी रस्त्याने दुचाकीवरून जात असतांना बिडी किंवा सिगारेट फेकल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षदर्शी यांच्या माहितीनुसार ट्रक वळणावर असतांना गाडी ओव्हर लोड असल्यामुळे तारांच्या स्पर्शाने ही आग लागल्याचे बोलले जात होते.

मनपाचे दोन बंब घटनास्थळी
दुपारी 12 वाजेच्या सुमारास ट्रकला शार्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीची माहिती ट्रकचालक प्रविण पाटील यांनी महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाला फोन करून बोलाविल्यानंतर सुरूवातील एक बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. कापसाला लागलेली आग ही नेमकी दिसत नसल्याने आग आटोक्यात येत नव्हती तर लगेच मनपाच्या दुसर्‍या अग्नीशमन बंबाने आग विझविण्याचे काम सुरू केले. दरम्यान आग लागल्यानंतर ट्रकने पेट घेवून नये यासाठी स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्तिचे प्रयत्न केले. यावेळी गाठोड्यावर पाणी मारत असतांना काही तरूणांनी गाठोडे गाडीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.