विधवा, घटस्फोटितांना दहा हजार रुपये अर्थसहाय्य

0

महापालिका नागरवस्ती विकास विभागाच्या वतीने रक्कमेत वाढ
खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने विधवा व घटस्फोटित महिलांना अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत असून 815 लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी येणार्‍या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागरवस्ती विकास विभागाच्या वतीने विधवा व घटस्फोटित महिलांना सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य यापूर्वी देण्यात येत होते. त्यामध्ये वाढ करून ते 10 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास मंजुरी देण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 24 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘पीएमपी’ला 18 कोटी संचलनतूट
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. जलनिःसारण विभागाकडील विजयनगर, काळेवाडी, तापकीरनगर या भागातील मलनिःसारण नलिकांची सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 33 लाख 29 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे महानगर परिवहन महामंडळास समायोजन करण्याच्या अटीस अधिन राहून सन 2016-17 मधील उर्वरित संचलनतूट 18 कोटी 17 लाख रुपये पुणे महनगर परिवहन महामंडळास अदा करणेस मान्यता देण्यात आली.

पोलिसांसाठी 1 कोटी 92 लाख
अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम निर्मुलनासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे माहे जानेवारी- 2016 ते माहे फेब्रुवारी 2017 अखेरचे मासिक वेतन अदा करण्यासाठी येणार्‍या सुमारे 1 कोटी 92 लाख 23 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 20 येथील आरक्षण क्र. 53 मध्ये व्यापारी संकुल विकसित करण्यात येणार असून भूमिगत वीज वाहिन्या हलविण्यासाठी सुमारे 62 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

अग्निशामक साहित्यास मंजुरी
अग्निशामक विभागास आवश्यक अग्निशामक बचाव साधने साहित्य खरेदी करण्यासाठी येणार्‍या सुमारे दोन कोटी 4 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. अ,ब,ग,व,ह क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाच्या वापरासाठी अतिक्रमण वाहने खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 40 लाख पाच हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपळे गुरव येथील स.नं. 80/3/30 पैकी सि.स.नं. 2495 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र. 355 सी.पी.जी. लहान मुलांचे खेळाचे मैदान बाधित क्षेत्राचा मोबदला देण्यासाठी येणार्‍या सुमारे 28 लाख 41 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.