विधवा मुस्लीम महिलेला एका मराठा हिंदु लोकप्रतिनिधीकडून मिळाली ‘ईदी’

0

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे ‘अपनापन’ दर्शन; रमजान ईदला मिळाले रेश्मा शेख यांना नवे घर
माय मावळ फाउंडेशनचा उपक्रम

मावळ : जातीय सलोख्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनातर्फे गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेषत: महाराष्ट्र पोलिसांमार्फत जातीय सलोख्याचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. मात्र हे काम केवळ सरकार आणि शासनाचेच उत्तरदायित्व नसून समाजांनी देखील त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा नेते मंडळी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील केली आहे. देशभरात जातीय ताणतणावाच्या अनेक घटना एकीकडे घडत असताना मावळ तालुक्यात मात्र जातीय सलोख्याचे प्रयत्न समाजातील काही मंडळींकडून होताना दिसतात. रमजान ईदच्या दिवशी (ता.16) एका विधवा मुस्लीम महिलेला एका मराठा हिंदु लोकप्रतिनिधीकडून ‘ईदी’ देण्यात आली आहे ती अनोखी आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा माय मावळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी चांदखेड(ता. मावळ) येथील रेश्मा अहमद शेख या शेतमजुर महिलेचे मोडकळीस घर नव्याने बांधून दिले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घराचे सुरू असलेले बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आले. घरास ‘अपनापन’ नाव देण्यात आले. ईदच्या मुहूर्तावर माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते ते रेश्मा शेख यांना सुपूर्त करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अमीन खान होते.

सामाजिक बांधिलकीचे दर्शन
आझम पानसरे म्हणाले की, सुनील शेळके यांनी तालुक्यातील सर्व समाजांसाठी स्वखर्चातून मदत केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील उपेक्षितांसाठी त्यांनी औषधोपचार, लग्नकार्य, ज्येष्ठांसाठी आरोग्योपचार, भुकेल्यांसाठी, वृध्दांसाठी दररोज घरपोच जेवणाचे डबे, सामाजिक उपक्रमांसाठी निधी अशा कितीतरी प्रकारे त्यांनी केलेल्या मदतीमुळे सामाजिक सलोख्याबरोबरच लोकप्रतिनिधींची प्रतिमा देखील आशादायक होण्यास मदत झाली आहे. अनेक गावातील विकासकामांसाठी केवळ शासनाच्या योजनेवर अवलंबून न राहता त्यांनी गावकर्‍यांचे श्रमदान आणि लोकवर्गणीची सांगड घातल उर्वरित रक्कम स्वत: खर्च करून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे.

शेळके यांचे काम उल्लेखनीय
शेळके यांनी आज ‘अपनापन’च्या माध्यमातून या संतभूमीच्या परंपरेत सामाजिक ऐक्याची भर घातली आहे. लोकप्रतिनिधींच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उमटत असताना शेळके यांनी केलेले काम आशा निर्माण करणारे असल्याचे अमीन खान यांनी यावेळी बोलताना सांगितले. रेश्मा शेख म्हणाल्या की, आज जे घर मिळाले आहे त्यामुळे आता दोन मुली व एका मुलाचे शिक्षण, संगोपन आणि संसारातील आईची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे निभावू शकेल. प्रास्ताविकात सुनील शेळके म्हणाले की, रेश्माताईंना घर बांधून दिले ते निरपेक्ष भावनेने दिलेली भेट आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सामाजिक उत्तरदायित्वाचे भान नेत्यांनी ठेवले तर सामाजिक सलोख्यास मोठे बळ मिळते. पैसा कमावून जो आनंद मिळतो त्यापेक्षा तो सत्पात्री दानधर्मातून मिळणारा अधिक असतो. विद्या ददति विनयं, विनयात याति पात्रताम्, पात्रत्वाद् धनमाप्नोति, धनाद् धर्म तत: सुखम.. या भावनेतून आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारातून आपण जातपात न पाहाता गरजूंसाठी प्रामाणिकपणे काम करतो आहोत.

यावेळी सरपंच अमोल कांबळे, उपसरपंच पोरस बारमुख, पोलिस पाटील दत्ता माळी, नगरसेवक संदीप शेळके, बाबुलाल नालबंद, अब्दुल शेख, सामाजिक कार्यकर्त्या हसिना मुलाणी, अजित आगळे, गोपीचंद गराडे, गोकूळ किर्वे, सुधाकर शेळके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.