विधवा वहिनीशी दिराने बांधल्या सात जन्माच्या गाठी

0

फैजपूर शहरात नाथजोगी समाजाचा असाही आदर्श विवाह

फैजपूर- अपघातात पतीचा झालेला मृत्यू, पितृछत्र हरपल्याने आठ वर्षीय काजलच्या भविष्याच्या चिंतेत अडकलेल्या वहिनीचा दिरानेच स्वीकार करून सात जन्माची सोबत देण्याचे आश्‍वासन देत विवाह केला. नाथजोगी समाजात शुक्रवारी झालेल्या या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अपघातात पतीचा झाला मृत्यू
मृत्यू हे अटळ सत्य असलेतरी भरल्या संसारात पतीचा झालेला अकाली मृत्यू सर्वांसाठीच आघात ठरला होता. फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठेतील नितीन देविदास जोगी हा चहा व्यावसायीकाशी नऊ वर्षापूर्वी सुनंदा पंढरीनाथ जोगी या तरुणीचा विवाह झाला. लग्नाच्या संसार वेलीवर काजल नावाचे फुलही उमलले मात्र सुमारे दिड वर्षांपूर्वी एका अपघातात नितीचा मृत्यू झाल्याने जोगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुनंदा या दुःख सागरात बुडाल्या असतानाच घरातील थोरल्या मंडळीसह फौजदार सुरेश वैद्य यांच्या पुढाकाराने सुनंदा हिचा पुनर्विवाहाचा प्रस्ताव तुळशीरामसमोर ठेवण्यात आला तर तुळशीरामनेही लागलीच होकार दिल्याने विधवा वहिनीसोबत दिराचा आदर्श विवाह शुक्रवारी पार पडला.

काजलला मिळाले पुन्हा पितृछत्र
तुळशीराम याने मयत मोठ्या भावाची मुलगी काजलचा स्वीकार करत तिलाही पितृछत्र दिले. या लग्न सोहळ्याप्रसंगी सर्वांच्याच डोळ्यातून नकळत आनंदाळू तराळले. या लग्न सोहळ्याचा लग्न विधी पुरोहित तुषार पाठक यांनी पार पाडला तर कन्यादान राजेंद्र बाविस्कर यांनी केले. शुभेच्छा देण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, माजी नगरसेवक विश्वनाथ कापडे, शुभम टेक्स्टाईलचे संचालक सुनील वाढे, समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव मोरे, फौजदार सुरेश वैद्य, सावदा पालिका भाजप गटनेते अजय भारंबे, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य पंकज येवले, सुनील रमेश वाढे, सुनील जोगी, सावदा भाजपा शहराध्यक्ष पराग पाटील आदींची उपस्थिती होती.