विधवा शेतकरी महिलांकडून आरक्षणाची मागणी

0

वर्धा । वेगवेगळे समाज घटक आरक्षणाची मागणी करत असताना आता शेतकर्‍याच्या घरातदेखील आरक्षणाची गरज वाटू लागली आहे. शेतकर्‍याला सरकारी नोकरदाराप्रमाणे, सैन्यातील सैनिकांप्रमाणे आरक्षण मिळाले असते, तर शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली नसती. शेतकर्‍यांना विविध बाबींमध्ये आरक्षण मिळायलाच पाहिजे, असा आग्रह आपला संसार उघड्यावर आलेल्या वर्ध्यातील शेतकरी विधवा महिला करू लागल्या आहेत. शेतकर्‍यांना आरक्षण मिळावे यासाठी शेतकरी महिलाही पुढाकार घेत आहेत. ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये असे ठराव घेऊन ते सरकार दरबारी पाठविले गेले आहेत. यात विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आघाडीवर आहेत.

सरकारकडून ठोस उपाययोजनाची मागणी
टाकळी किटे हे 350 लोकवस्तीचे गाव आहे. थोड्याफार फरकाने पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. पण महिलाही शेतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. शेतीवरच उपजीविका करणारे शेतकरी येथे आहेत, गाव सोडून गेले ते देखील बाहेरगावी राहून शेती करतात. शेतीवरच अवलंबून असलेल्या या गावात चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. गावकर्‍यांना कर्जमाफी तरी पुढे किती वर्ष मागावी हा प्रश्न पडला आहे. सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करत गावकर्‍यांनी शेतकरी आरक्षणाचीच मागणी केली आहे. शेतकर्‍यांच्या मुलांच्या उच्चशिक्षणासह नोकरी आणि विविध योजनांमधून आरक्षण मिळायला पाहिजे, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. मागील काही काळात टाकळी किटे येथील शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यावर शेतीसाठी घेतलेले एक लाख 70 हजार रुपयांचे कर्ज होते. दोन वर्षांपासून शेतीत पिकत नसल्याने ते कर्ज फेडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र आज त्या शेतकर्‍याचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात आहे. आतापर्यंत शेकडो ग्रामपचायतींनी ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन शेतकर्‍यांसाठी आरक्षणाची मागणी केली आहे. आता शेतकरी विधवांनीदेखील शेतकरी आरक्षणाची मागणी केल्याने या चर्चेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.