नव्या चेहऱ्यांना संधी, घोडेबाजार व राजकीय कुरघोडीला लगाम
निलेश झालटे, नागपूर: विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. विधानसभेतील सर्व पक्षांच्या संख्याबळासह विचार करता आवश्यक तेवढेच उमेदवार सर्वच पक्षांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे 11 जागांसाठी 11 उमेदवारांची नावे जाहीर झाली असून निवडणूक बिनविरोध होईल असे निश्चित मानले जात आहे. या 11 जागांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक 5 शिवसेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 तर शेकाप 1 असे प्रतिनिधित्व मिळणार आहे. 11 जागांवर 11 च उमेदवार जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून घोडेबाजार व राजकीय कुरघोडीला लगाम लावण्यात सर्वच नेत्यांना यश आल्याचे मानले जात आहे.
हे देखील वाचा
उपसभापती ठाकरे यांचा पत्ता कट
भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे सहयोगी आमदार व मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक यांना उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल परब व मनीषा कायंदे यांना पसंती दिली आहे. काँग्रेसने शरद रणपिसे यांना पुन्हा संधी देत यवतमाळमधील गुलाम नबी आझाद यांचे कट्टर समर्थक वजाहद मिर्झा या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना मात्र उमेदवरीपासून वंचित ठेवले आहे. राष्ट्रवादीने बाबाजानी दुर्रानी यांची उमेदवारी घोषित केली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप यांचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील हे आहेत. 5 जुलै, गुरुवार हा उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरचा दिवस आहे तर 16 जुलै रोजी मतदान होणार आहे. पण 11 च उमेदवार मैदानात असल्याने मतदान होण्याची शक्यता नसल्याचा दावा करण्यात येत आहे.