काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह
नागपूर : विधानपरिषदेच्या 16 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. ४ जुलै रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवडून देण्याबाबत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परभणीची जागा काँग्रेसला तर बीडची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती. त्यामुळे परभणीचे राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य दुर्रानी यांचा पत्ता कापला गेला होता. काँग्रेसने तेथे सुरेश देशमुख यांना उमेदवारी दिली होती. या बदल्यात पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना राष्ट्रवादीने बीडमधून उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत कराड यांनी नाट्यमय उमेदवारी मागे घेतल्यामुळे सुरेश धस विजयी झाले आहेत.
आता १६ जुलै रोजी विधानसभेच्या सदस्यांद्वारे विधानपरिषदेवर ११ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून जाणार आहे. त्यामुळे या जागेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या व माजी राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांना पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून प्रोजेक्ट केले होते. प्रा. खान यांचे परभणीमध्ये फारसे वर्चस्व नसताना त्यांना झुकते माप दिले जात असल्याने पक्षातील इच्छूक नाराज झाले होते. विधानसभेची आगामी निवडणूक लक्षात घेता कार्यकर्त्यांची नाराजी राष्ट्रवादीला राजकीय दृष्ट्या परवडणारे नसल्याचे पाहून अखेरीस बाबाजानी दुर्रानी यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्रानी यांना संधी देण्यामागे अल्पसंख्यांकांची मते राष्ट्रवादीकडे वळविण्याचा उद्देश आहे. दुर्रानी हे २०१२ ते २०१८ या कालावधीत विधानपरिषद सदस्य होते.
हर्षवर्धन पाटलांसाठी राष्ट्रवादीची खेळी!
दुराणी यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे. हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवितात. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फिल्डिंग लावली असली तरी राष्ट्रवादीसुद्धा पाटील यांच्यासाठी आपले वजन खर्च करत आहे. पाटील हे शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. इंदापूर विधानसभा मतदार संघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. सध्या बारामतीचे प्रतिनिधित्व सुप्रिया सुळे करत आहेत. भविष्यातील राजकीय अडचण दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने पाटील यांच्या नावाची खेळी खेळल्याची चर्चा आहे.