विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे नाना पटोले करणार अर्ज

0

मुंबई: गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर विधासभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहे. तर भाजपा कडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्या मुळे पुन्हा एकदा विधासभा अध्यक्षपदासाठी भाजपा, कॉंग्रेस पक्षात रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

नाना पटोले यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले की, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील. ते म्हणाले, ‘काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी तीन-चार नावं सुचवली होती. आम्ही सांगितली की तुम्ही यापैकी कोणतंही नाव निवडा, आमची त्याला हरकत नाही.’

नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज पटलावर येणार आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे हे पद यापुढेही राष्ट्रवादीकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. जर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेलं तर उपमुख्यमंत्रिपद स्वाभाविकपणे काँग्रेसकडेच जाईल अशी शक्यताही त्यामुळे वर्तवण्यात येत होती. पण या सर्व शक्यतांना आज पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपमुख्यमंत्रि राष्ट्रवादीचा हे आता स्पष्ट झाले आहे.