विधानसभा निवडणूक ; खडसेंना कोंडी फोडण्याची अखेरची संधी

0

मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीमुळेच राजकीय बळी ; स्व-पक्षावर जाहिर टिकेसह पक्षशिस्त मोडणेही भोवले

भुसावळ (गणेश वाघ)- भाजपा सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकारने दाखवले नाही मात्र राज्यातील पहिल्या फळीतील हेवीवेट नेते असलेल्या एकनाथराव खडसेंवर विविध आरोप होताच राजीनामा घेण्यात आला, चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून खडसेंना बिझी ठेवण्यात आले मात्र सर्व शुक्लकाष्टातून खडसेंना क्लीनचिट मिळाल्यानंतरही खडसेंना सरकारने अखेरपर्यंत क्लीनचीट देण्याचे धाडस दाखवलेच नाही त्यामुळे खडसे कमालीचे व्यथीत झाले आहेत. पावसाळी अधिवेशनातही त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली मात्र सरकारला पाझर फुटला नाही. आता खडसेंनी थेट ‘तिकीट मिळो अथवा न मिळो, जनता पाठीशी’ असल्याचे सांगून राज्यात खळबळ उडवून दिली आहे. खडसेंना खरे आताची विधानसभा निवडणूक कोंडी फोडण्यासाठीची अखेरची संधी ठरणार आहे मात्र यावेळची निवडणूक पहिल्याइतकी निश्‍चित सोपी नाही. असे असलेतरी खडसेंनी स्वतः आपणच भाजपाचे दावेदार उमेदवार असल्याचे आजच जाहीर केल्याने ते भाजपा सोडणार नाहीत हेदेखील तितकेच खरे ! काही महिन्यांनी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत खडसे फारतर पक्षाला शिंगावर घेवून कोंडी फोडू शकतात मात्र त्यानंतरही पदरात काहीही न पडल्यास खडसे केवळ आगामी काळात भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ठरतील हेदेखील तितकेच सत्य !

पक्षशिस्त मोडणे भोवले
खडसेंचा राज्यभर असलेला दरारा, पक्षातील ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानेच खडसेंना खड्यासारखे बाजूला सारून त्यांचा राजकीय बळी घेण्यात आला, असे म्हणणे धाडसाचे ठरेल मात्र दुसर्‍या बाजूचा विचार केल्यास स्व-पक्षावर जाहीरपणे केलेली टिका, पक्षशिस्त मोडणेही तसेच सरकारमधील ‘मर्मस्थळांवर’ ठेवलेला हात खडसेंच्या राजकीय कारकिर्दीला ‘ब्रेक’ लागण्यास भाग पडल्याचे बोलले जात आहे. ‘चंदनाच्या झाडावर सापांनी मान टाकावी’ त्याप्रमाणे खडसेंच्या आजूबाजूला शत्रू उभे असून योग्य संधीची वाट पाहत आहेत मात्र खडसे आजही गाफील आहेत.

षडयंत्राचा बळी ; खान्देशचे मोठे नुकसान
1980 च्या दशकात भाजपाचा एकही जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य नसताना खडसेंनी डॉ.गुणवंतराव सरोदे, स्व.फडके यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवला, सत्ता काबीज केल्याने गल्ली ते दिल्ली खडसेंचे वजन वाढले मात्र त्यासोबत विरोधकदेखील वाढले. भाजपा पक्ष वाढवण्याचे निर्विवाद श्रेय खडसेंना असलेतरी हे सर्व करताना जुळवून घेण्यात कुठेतरी गल्लत झाली. ज्या पद्धत्तीने ‘आपल्याच सर्व काही हवे’ ही वृत्ती वाढत गेली त्यामुळे गिरीश महाजनांना एक प्रकारे बळ मिळाल्याचे म्हणणे वावगे ठरू नये. महाजनांनी आपल्या कार्याची रेष हळूहळू मोठी केली मात्र खडसेंच्या बाबतीत तसे घडले नाही. सतत 40 वर्ष राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या लोकनेत्याला मात्र आपल्याच पक्षाने हळूहळू दूर लोटले. सर्व आरोपातून क्लीनचीट मिळाल्यानंतरही खडसे आज मंत्री पदावर नाही व भविष्यातही त्यांना पद मिळेलच याची शाश्‍वती नाही त्याचा फटका खान्देशाच्या विकासाला बसला आहे हेदेखील तितकेच खरे. मंत्री पदावर घेतलेल्या शेकडो निर्णयांना स्व-पक्षानेच ब्रेक लावल्याने खडसेंप्रमाणेच हा खान्देशवासीयांवरदेखील अन्यायच म्हणावा लागेल.

टीका भोवली, पक्षशिस्तही मोडली
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या बायकोशी संभाषण, पीएने मागितलेली 30 कोटींची लाच, जावयाची लिमोझीन कार, भोसरी जमीन प्रकरण, दहा हजार कोटींची जमवलेली अपसंपदा हे खडसेंवरील आरोप देशभरात गाजले तर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया हात धुवून खडसेंच्या मागे लागल्यानंतर खडसेंना राजीनामा द्यावा लागला (अर्थात घेण्यात आला). त्यानंतर प्रत्येक आरोपांची खोलवर चौकशी होवून खडसे सर्व दिव्यातून निर्दोष बाहेर पडलेही मात्र सरकारने त्यांना उघडपणे क्लीनचीट न दिल्याने पदापासून दूर गेल्याने आलेल्या नैराश्यातून खडसेंनी आपल्याच सरकारवर विखारी टिका अवलंबली. ही बाब निश्‍चितच पक्षशिस्तीला धरून नव्हती. चार भिंतीआड बोलण्याच्या गोष्टी जनतेच्या दरबारात बोलल्या गेल्याने पक्षश्रेष्ठींना ही बाबही रूचली नाही. अलिकडच्या काळात पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, विनोद तावडे यांच्यासह भाजपाच्या डझनभर मंत्र्यांवर आरोप झाले, टिका झाली मात्र या नेत्यांनी पक्षशिस्त पाळल्याने त्यांना कालांतराने क्लीनचीटही मिळाली.

खडसेंना अतिमहत्वाकांक्षा नडली
हेवीवेट नेते खडसेंचे वाढणारे वलय पक्षातील काहींना खटकत असतानाच पंढरपूरातील श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर खडसेंनी राज्याला ओबीसी मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली. यामागे त्यांची मुख्यमंत्री होण्याची मनीषा लपून राहिली नाही मात्र या विधानाने खडसेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लागण्यास सुरुवात झाली. यश राखण्यासोबतच नम्रता व सरकारशी जुळवून घेण्यात अडचणी निर्माण होत गेल्याने खडसेंचा पाय आणखीनच खोलवर गेला शिवाय अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या आत्मविश्‍वासाचा फटकाही त्यांना कालांतराने बसला, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

‘मर्मस्थळांवर’ हात ठेवणे पडले महाग
मंत्री पदावर असताना खडसेंनी जनताभिमुख शेकडो निर्णय घेतल्याने जनतेच्या गळ्यातील ते ताईत बनले मात्र उद्योगपती अंबानींच्या बंगल्यांसह श्रीमंतांच्या बंगला जप्तीची तयारी सुरू केल्याने ही बाब अनेकांना पचनी पडली नाही. याबाबतची खंत त्यांनी सावद्याच्या सभेत बोलूनही दाखवली. मुख्यमंत्री व्हावे व श्रीमंतांच्या जमिनी सरकारजमा करण्याची तयारी सुरू केल्यानेच आपली गत झाल्याची कबुली देवून त्यांनी पुन्हा सरकारकडे अंगुलीनिर्देश केला. खडसेंचा पाय खोलवर जात असताना मुख्यमंत्र्यांनी दुसरीकडे गिरीश महाजनांची ताकद वाढवून पर्यायी नेतृत्व उभे केले. राज्यभरातील मोर्चे, ठिकठिकाणच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मिळवलेल्या एकहाती सत्तेमुळे महाजन ‘संकटमोचक’ ठरले तर दुसरीकडे खडसे-महाजनांमधील विस्तव मात्र वाढतच गेला.

भ्रष्टाचाराचे पुरावे अन् खडसेंच्या भूमिकेकडे लागले लक्ष
40 वर्षांच्या राजकारणात भ्रष्टाचाराचा एकही डाग नसताना बेछूट आरोपांनी खडसे कमालीचे व्यथीत झाले आहे. पावसाळी अधिवेशनात त्यांनी तशी खंतही व्यक्त केली मात्र सरकारने याहीवेळी त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने खडसे आता अधिकच उद्विग्न झाले आहे. आतातर खडसेंनी भाजपा तिकीट देवो अथवा न देवा, जनता पाठीशी असल्याचे वक्तव्य करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे. जनता हीच खरी खडसेंची ताकद आहे हे एव्हाना सरकारच्याही लक्षात आले आहे त्यामुळे खडसे हेच मुक्ताईनगर विधानसभेचे उमेदवार असतील हे त्यांनी जाहीर केले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आता एकीची मोट बांधून त्यांच्या विरोधात लढावे लागणार आहे. ‘ढीगभर भ्रष्टाचाराच्या फाईली आपल्याकडे पडून आहेत’ या त्यांच्या अधिवेशनातील वक्तव्यातूनही खडसे आणखी आक्रमक भूमिका घेतील हा देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. खडसे मात्र विरोधकांऐवजी पक्षातील अंतर्गत विरोधाचे बळी ठरले हे सांगण्यासाठी कुणा ज्योतीषाची गरज नसावी !

जाता-जाता… सूचक इशारा !
राजकारण हे सत्तेचे केंद्र असलेतरी खुर्ची मात्र दरवेळीच बदलते त्यामुळे खडसेंनी रावेरच्या चिंतन बैठकीत ‘आज माझी जी अवस्था झाली आहे, ती तुमचीदेखील एक दिवस निश्‍चित होईल व तुम्ही देखील बाजूला होणार आहात’ हा दिलेला सूचक इशारा सत्तेची नशा डोक्यात असणार्‍यांना चपखल लागू होतो.