बारामती । राज्यातील विविध भागांसह कर्जत-जामखेडचे कार्यकर्तेही विधानसभेची निवडणूक त्या मतदारसंघातून लढविण्यासाठी आपल्याला आग्रह करीत आहेत. मात्र, बारामतीकर सोडत नाहीत तोपर्यंत विधानसभेची निवडणूक येथूनच लढवणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आपण राज्यभर फिरलो आहोत, त्यामुळे तुम्ही मला ऐन वेळी विसरू नका, अन्यथा आपली वाटच लागेल, अशी जाहीर जाणीव आमदार अजित पवार यांनी बारामतीकरांना करून दिली.
बारामती तालुक्यातील पणदरे येथील शरद संकुलच्या इमारतीचे उद्घाटन अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पुरुषोत्तम जगताप, रोहिणी तावरे, संभाजी होळकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भाजप-सेना युतीवर टीका
यावेळी पवार यांनी भाजप-शिवसेना युती सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. देशात साखरेचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. केंद्र आणि राज्य शासन याबाबत धोरण ठरवण्याची घोषणा करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात कृती कधी होणार हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा बँकांच्या नोटा स्वीकारण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, त्यातही काही रक्कम आजही बँकांकडे शिल्लक आहे, असे असताना नाबार्डकडून या नोटा बुडीत खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या या धोरणामुळे जिल्हा बँकांना मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
मला विसरू नका!
हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने आपण सध्या राज्यभर फिरत आहोत. त्यामुळे बारामतीकरांनो मला विसरू नका, नाही तर ऐनवेळी माझी वाट लागेल. आपण विधानसभेला रिंगणात उतरावे, अशी राज्याच्या विविध मतदारसंघातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, बारामतीकर आपल्याला सोडत नाहीत तोपर्यंत आपण बारामतीतूनच निवडणूक लढवणार, असा जाहीर खुलासाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आजपर्यंत न्याय नाही
राजकीय जीवनात अजाणतेपणे एखादी चूक होते. आपल्याही आयुष्यात अशी चूक झाली. आपण प्रायश्चित्तही घेतले, असे असताना काहीजण वारंवार त्यावर टीका करतात. अशी खंत व्यक्त करून पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून आत्तापर्यंत जनतेच्या भल्यासाठी काय केले हे जाहीर करावे. आरक्षण, कर्जमाफी, बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांना आजपर्यंत हे शासन न्याय देऊ शकले नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.