मुंबई:- विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या माजी सदस्यांना सभागृहाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. चंद्रकांत छाजेड, विदर्भविर जांबुवंतराव धोटे, आनंदराव देसाई, पुंजाजी कडूपाटील, रावसाहेब आकोजीकर, बाबूसिंग राठोड, चंद्रशेखर भोसले या माजी विधानसभा सदस्यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, राकाँपाचे गटनेता अजित पवार, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, ना. विजय शिवतारे यांनी श्रद्धांजली प्रस्तावाचे वाचन केले. यानंतर सभागृहात दोन मिनिटे स्तब्ध राहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पहिल्या सत्रात 6 अध्यादेश पारित
पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधामंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले 6 अध्यादेश एकमताने पारित करण्यात आले. मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करण्याबाबत, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 यामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी सुधारणा करण्याबाबत, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम, 2005 मध्ये सुधारणा करण्यासंबंधी अध्यादेश पारित करण्यात आले.
याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्यासंबंधी अध्यादेश तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यासंबंधी अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. सभागृहात हे सर्व अध्यादेश एकमताने पारित करण्यात आले.