मुंबई: काल गुरुवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी पदभार देखील स्वीकारला. उद्या विधिमंडळाच्या अधिवेशाला सुरुवात होऊ शकते. दरम्यान आज राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदारांना शपथ देण्यासाठी भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष पदावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असून कॉग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद जाणार असल्याचे बोलले जात आहे.