नवी दिल्ली-देशभरातल्या 9 राज्यांमधल्या 10 विधासभांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अवघी एक जागा जिंकता आली आहे. कर्नाटकमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर हा आणखी एक धक्का भाजपाला बसल्याचं मानण्यात येत आहे. जोकिहाट (बिहार), गोमिया व सिली (झारखंड), छेनगन्नूर (केरळ), नूरपूर (उत्तर प्रदेश), थराळी (उत्तराखंड), पळूस कडेगाव (महाराष्ट्र), अंपती (मेघालय), शाहकोट (पंजाब) व महेशताला (पश्चिम बंगाल) या जागांसाठी मतदान झालं होतं. तसंच कर्नाटकमधल्या राजराजेश्वरी नगरमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकालही आज जाहीर करण्यात आला.
कॉंग्रेसने जिंकल्या ४ जागा
काँग्रेसने चार जागा जिंकल्या असून त्यामध्ये पळूस कडेगाव, अंपती, राजराजेश्वर नगर व शाहकोटचा समावेश आहे. केरळमधल्या चेंगन्नूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं विजय मिळवला. बिहारमध्ये जोकीघाटमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा विजय झाला. समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशमध्ये नूरपूरमध्ये विजय संपादन केला. झारखंडमधल्या दोन्ही जागा जेएमएमनं जिंकल्या. महेशथलाची जागा तृणमूलनं जिंकली असून भाजपाला उत्तराखंडमधल्या थराळी या एकमेव जागेवर विजय मिळवता आला आहे.
तर लोकसभेच्या ४ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यातली पालघरची एक जागा भाजपाला जिंकता आली आहे. तर कैराना या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये राष्ट्रीय लोक दलाचा विजय झाला, जो योगी आदित्यनाथ यांना धक्का मानण्यात येत आहे. भंडारा गोंदिया या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तर नागालँडमधली जागा एनडीपीपीनं जिंकली आहे.