विधानसभेत नववा दिवसही वाया !

0

मुंबई:- विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या नवव्या दिवशीही विरोधी पक्ष आणि शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने कामकाज होऊ शकले नाही. मोठ्या प्रमानावर गोंधळ झाल्याने दुपारी 2 वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान अभूतपूर्व गोंधळामध्येच आर्थिक संरक्षण अहवाल मांडण्यात आला. सुरुवातीपासूनच शेतकरी कर्जमाफीचा गोंधळ सुरु असल्याने कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 4 वेळेस स्थगित करून शेवटी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सर्वपक्षीय सदस्य कर्जमाफीच्या मुद्दयावर आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने गोंधळात काही कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे तुरळक कामकाज वगळता काहीही कामकाज होऊ शकले नाही.

5 मिनिटांचे देखील काम नाही!
11 वाजता सभागृहाची बैठक सुरु झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराची घोषणा केली. यानंतर विरोधकांनी आणि शिवसेना तसेच भाजपच्या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरु केली. अध्यक्षांनी अवघ्या एका मिनिटात कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. यानंतर 11.30 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर तीन मिनिटात पुन्हा अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. 12 वाजता गोंधळ झाल्याने 1 वाजेपर्यंत तर 1 वाजता पुन्हा गोंधळ झाल्याने 2 पर्यंत स्थगिती देऊन कामकाज चालविण्याची आशा निर्माण झाली होती मात्र गोंधळ थांबत नसल्याची चिन्हे दिसताच दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

सेना पुन्हा आक्रमक तर भाजप बाकावर

सभागृहात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय, मोदी सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, कृषिमंत्री हाय हाय, शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारची घोषणाबाजी सभागृहात केली गेली. काल काहीशी शांत भूमिका घेतलेली सेना आज पुन्हा आक्रमक दिसून आली. मात्र शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत विरोधकांसह वेलमध्ये उतरणारे भाजप सदस्य मात्र आपापल्या जागेवर शांत बसून असलेले दिसून आले.